अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला

अभिनेता सैफ अली खान

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री घरात शिरून चोराने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मानेवर आणि पाठीवर खोलवर जखमा झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांची तब्बल १५ पथकं या घटनेचा तपास करत आहेत. सुरुवातीला मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफ अली खानच्या इमारतीत, गेटवर किंवा मजल्यावर कोणत्याही संशयास्पद व्यक्तीचा वावर दिसून आला नव्हता. त्यामुळे चोर सैफच्या घरात कसा शिरला, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. अखेर पोलिसांनी सकाळपासून वेगाने काम करत सैफची इमारत आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासाअंती पोलिसांना एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

 

 

 

हे सीसीटीव्ही फुटेज सैफ अली खानच्या घराच्या परिसरातील आहे. यामध्ये दिसणाऱ्या दोन संशयित व्यक्तींपैकी एकाने सैफ अली खानवर हल्ला केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. तपासावेळी पोलिसांच्या हाती आणखी एक माहिती लागली आहे. त्यानुसार सैफच्या इमारतीमध्ये काम करणारा एक व्यक्ती या दोन संशयितांच्या ओळखीचा असून तो या सगळ्यात सामील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी सध्या या दोन संशयित व्यक्तींना शोधण्यासाठी पथके कामाला लावली आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत पोलिसांची ७ आणि गुन्हे शाखेची ८ पथके तपास करत आहेत. या इमारतीला एक फायर एक्झिट आणि डक्ट एरिया आहे. मात्र, या जागेतून आत ना शिरता चोर जवळील इमारतीतून सैफ अली खान यांच्या घरात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले आहे.सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या सर्वांची चौकशी केली जाणार असून पोलिसांनी घरातील महिलांच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

सैफ अली खान याच्यावर चोराने एकूण सहा वार केले. त्यापैकी त्याच्या मानेवर १० इंचाची खोल जखम झाली आहे. तर पाठीत धारदार शस्त्राचे पाते रुतून बसले होते. सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पाठीतील रुतलेले शस्त्राचे पाते काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here