छत्तीसगडमध्ये भीषण चकमक; १२ नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान

छत्तीसगड
File Photo

बिजापूर (छत्तीसगड) (वृत्तसंस्था) : जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी ९ वाजता ही चकमक घडली. सायंकाळीही अधूनमधून गोळीबार सुरू होता. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे. या कारवाईत एक हजार सैनिक सहभागी आहेत. सैनिकांनी ५०-७० नक्षलवाद्यांना घेरल्याचे वृत्त आहे. आयजी पी. सुंदरराज या मोहीमेची स्वतः देखरेख करत आहेत.

 

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ९ वाजता चकमक सुरू झाली. या ऑपरेशन्समध्ये विजापूर-सुकुमा येथील डीआरजी जवान, सीआरपीएफचे ५ वे कोब्रा युनीट, सीआरपीएफचे २२९ वे बटालियनचे जवान सहभागी आहेत.’ ‘प्राथमिक माहितीनुसार, चकमकीत १२ नक्षलवादी मारले गेले. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलांचे कोणतंही नुकसान झालेले नाही.

 

यासह, या महिन्यात आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. १२ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यातील मद्दीद पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच माओवादी ठार झाले होते. गेल्या वर्षी, राज्यात विविध चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवाद्यांना ठार केलं. ६ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये आयईडीने एक वाहन उडवून दिले होते. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते.

 

दरम्यान, विजापूरमधील दुसऱ्या एका घटनेत, नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ २२९ आणि कोब्रा यांचे संयुक्त पथक कॅम्प पुटकेल येथून मोहिमेवर निघाले असताना माओवाद्यांनी लावलेल्या प्रेशर आयईडीच्या स्फोटात दोन जवान जखमी झाले. जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here