मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वांद्रे परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडून अडीच कोटी रुपये उकळण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करणारा कुख्यात गुंड डी. के. राव याच्यासह एकूण ७ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली. राव हा छोटा राजनचा साथीदार असून, त्याच्यावर यापूर्वी खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
वांद्रे पोलिसांना एका हॉटेल व्यावसायिकाकडून तक्रार मिळाली होती की, राव आणि इतर सहा जणांनी त्यांची आस्थापना ताब्यात घेण्याचा कट रचला, त्यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. राव यांची टोळी गेल्या दोन वर्षांपासून आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही हॉटेल मालकाने तक्रारीत केला होता.
या तक्रारीच्या आधारे राव आणि इतर व्यक्तींविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आणि बुधवारी रात्री उशिरा सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







