शास्त्रीय संगीत समृध्द करणारे पद्मविभूषण पंडित जसराज यांचे निधन
वॉशिंग्टन – शास्त्रीय गायनाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या निधनानंतर संपूर्ण संगीत विश्व शोकसागरात बुडाले आहे.
भारतात शास्त्रीय संगीताची युगांयुगांपासून एक मोठी परंपरा आहे. या संगीताने आपली जी खास ओळख निर्माण केली, ती ओळख कायम ठेवण्यासाठी अनेक कलावंतांनी गायनासाठी समाधी लावली. अनेक कलावंत तल्लीन होऊन या शास्त्रीय संगीताच्या गोडव्याने रसिकांना रिझवत आले आहेत. रसिकांच्या हृदयात त्यांनी आपले हक्काचे घर केले आहे. त्यातलेच एक म्हणजे जगविख्यात गायक पंडित जसराज होत.
पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी १९३० रोजी शास्त्रीय गायनाची समृद्ध परंपरा असलेल्या घरात झाला. त्यांचे वडील पंडित मोतीराम हे मेवाती घराण्याचे एक संगीतज्ञ होते. पंडित जसराज यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. परंतु पं. जसराज फक्त तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालन-पोषण पंडित मणीराम यांनी केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंडित जसराज यांचे संगीत शिक्षण पुढे सुरू राहिले आणि ते तबला वादक झाले. पंडित जसराज यांना मणीराम हे तबलावादक म्हणूनच घेऊन जात होते. परंतु त्यावेळेस तबला वादकाला यथोचित सन्मान देण्यात येत नव्हता. त्यामुळे पंडित जसराज व्यथित झाले. १४ वर्षीय पं. जसराज यांनी तबला सोडला आणि त्यांनी शास्त्रीय संगीतात विशारद होण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी मेवाती घराण्याचे दिग्गज महाराणा जयवंत सिंह वाघेला आणि आग-याचे स्वामी वल्लभभाई यांच्याकडून संगीत विशारद घेतली. पंडित जसराज यांच्या गायनातील शुद्ध उच्चारण आणि स्पष्टता मेवाती घराण्याच्या ‘खयाल’ शैलीचे वैशिटय़ अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या गायनाच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक श्वासाला सुरांची लय देऊन गाणा-या या जगविख्यात गायकाने आपले गायन म्हणजे ईश्वरसेवाच समजली आहे. आपल्या गायनातून ते साक्षात इश्वर आणि रसिकांची भेट घालून देतात. याचा अर्थ त्यांचे सूर, ताल आणि राग ऐकताना रसिकही समाधिस्त होतात. हे समाधिस्त होणेच ईश्वरभेट होय. सप्तसुरांचे इंद्रधनुष्य म्हणून ज्यांची ओळख होती.
पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. आपल्यापैकी खूप जणानां माहित नसेल कि जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई होते. त्यांची पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या होय.
पंडित जसराज हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रिय गायकांपैकी एक आहेत. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्करांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पंडित जसराज यांचे काही शिष्य हे आज नामांकित संगीतकार आहेत. पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान सापडलेल्या लघुग्रहाला पंडितजींचं नाव दिलं होतं.







