सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : येथील महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळे मधे शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून शाळेमध्ये अंक अक्षरन्हाणं हा उपक्रम साजरा करण्यात आला.
आपल्या संस्कृतीमध्ये मकरसंक्रांत सणाला घरातील लहान बाळांना बोरन्हाणं घालण्याची परंपरा आहे. याच परंपरेचे औचित्य साधून शाळेने लहान विद्यार्थ्यांना अक्षरन्हाण घातले. नर्सरी, लहान गट, मोठ्या गटातील लहानग्यांनी अंक अक्षर न्हाणाचा आनंद घेत अक्षरांशी मैत्री करून घेतली.यासाठी लहान विद्यार्थी काळा ड्रेस परिधान करून आणि तिळगुळाचे दागिने घालून आलेली होती.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अक्षराने त्यांना न्हाऊ घालण्याने एक नवा संस्कार मुलांवर रुजवला गेला. लहान मुले शाळेच्या वातावरणात रमावीत, त्यांच्यामध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी व त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग बळकट होण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व पालकांकडून करण्यात आले.
महिला पालकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. परिस्थितीमुळे सर्वच मुलांना घरी बोरन्हाणं मिळेलच असे नाही. पण शासन निर्णयाप्रमाणे शिक्षणाचे न्हाणं मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे यासाठी असे उपक्रम शाळेमध्ये राबविणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका शितल शिंदे, बालवाडी विभागातील सहाय्य्क शिक्षिका सुवर्णा लोहार, मनिषा खाडे, शिवानी पवार तसेच मदतनीस दिपाली टाकणे, कल्पना यादव या सर्वांनी सहकार्य केले.







