सोनीपत (हरियाणा) : एका १७ वर्षीय विद्यार्थीनीनं वंदे भारत ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. विद्यार्थीनीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुलीवर एका पुजारी आणि गावातील २ तरूणांनी लैंगिक अत्याचार केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. याच कारणामुळे तिनं ट्रेनसमोर उडी घेत आयुष्य संपवल्याची माहिती आहे. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या सोनीपतमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, त्यांची मुलगी इयत्ता बारावीत शिकत होती. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील २ तरूण तुषार आणि कमल मुलीला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते. मुलीनं यासंदर्भात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ४ मार्चला तुषार आणि कमल यांनी त्यांच्या मुलीला आमिष दाखवून गावातील मंदिरात पुजारी मनजीतकडे नेले होते.
५ मार्चला मनजीत यानं मृत मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीनं ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. तिन्ही आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्याचा संशय मुलीच्या वडिलांना आहे. ज्यामुळे तिने ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
जीआरपी स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक महाबीर तोमर यांनी सांगितले की, मृत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आणि त्यांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, जीआरपी पोलीस स्टेशनने तुषार, कमल आणि मनजीत यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.







