नागपूर (उपसंपादक आकाश शेगये) : जिल्ह्यातील भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गावातील टवाळखोर मुलांनी नर्सिंगच्या एक-दोन नव्हेतर १९ विद्यार्थिनींचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील डॉक्टर व नर्सेस आणि सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचताच टवाळखोर युवकांनी पळ काढला. या प्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत असून, त्याठिकाणी निवासी आहेत. गेल्या महिन्याभरापासून आरोग्य केंद्र परिसरात त्या वास्तव्यास असून, शुक्रवारी (दि.7) रात्री प्रशिणार्थी मुली आपल्या क्वॉर्टरकडे जात असताना गावातील काही टवाळखोरांनी परिसरातील आरोग्य केंद्राची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. तसेच संबधित मुलींना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला.
दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील डॉक्टर व नर्सेस आणि सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचताच टवाळखोर युवकांनी पळ काढला.
यानंतर गोंदिया येथील नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी दिली आहे.







