सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : बुधावलेवाडी, ता.खटाव येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बाळू गजानन बुधावले (वय ४०, रा. बुधावलेवाडी, ता. खटाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. बाळू बुधावले याने हिम्मत देवबा बुधावले (वय २८, रा. बुधावलेवाडी, ता.खटाव) या युवकाचा दि. २४ एप्रिल २०२० रोजी तलाव्याजवळ दगडाने ठेचून खून केला होता. कोकाटे तलावाजवळ हिम्मत बुधावले व प्रकाश महादेव मदने हे मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी बाळू बुधावले, संजय गजानन बुधवले, गजानन संभाजी बुधावले, अमित नानासो बुधावले, सूरज नाना बुधावले यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून हिम्मत यांना धक्काबुक्की करून खाली पाडले.
त्यावेळी सुरज नानासो बुधावले व संजय बुधावले यांनी साक्षीदार प्रकाश मदने यांना दगड फेकून मारुन घटनास्थळावरून पळून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी बाळू बुधावले व अमित बुधावले यांनी मयत हिम्मत यांना तलावाच्या पाण्यातून ओढून बाहेर काढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले. यावेळी संशयितांनी मयत हिम्मत यांना दगडाने ठेचून ठार मारले.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात पुसेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि व्ही. बी. घोडके यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील अजित कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने १५ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.







