जळगांव (संपादक सुनिल पाटील) : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या परीसरातील कंजरवाडा, तांबापुर, शिरसोली परिसरात धडक मोहीम राबवून एमआयडीसी पोलिसांनी दारुच्या भट्टया पोलिसांनी उध्वस्त करुन २७ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सण उत्सव दरम्यान काही टवाळखोर लोक दारु पिवुन उपद्रव निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतात. त्यामुळे या अवैध दारु विक्री व तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन, रामानंद, जिल्हापेठ, शनीपेठ, जळगाव शहर पोस्टे, आर. सी. पी, क्युआरटी पथकाने जळगाव शहरातील कंजरवाडा तसेच ग्रामीण भागातील शिरसोली प्रबो, प्रनं या भागात धडक मोहीम आखत, कोबींग ऑपरेशनद्वारा अवैधरीत्या दारु विक्री करणाऱ्या तसेच गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापे मारले.
विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत २७ संशयिकांकडून १० हजार १५ लीटर दारु बनविण्याकरीता लागणारे रसायन व मुद्देमालासह ७ लाख १ हजार ६२० रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली. सदर २७ संशयित आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाईत ११ अधिकारी, ४८ पोलीस अंमलदार, व २२ होमगार्ड, आरसीपीक्युआरटी पथकाचा सहभाग होता.







