पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे आमदार राजू खरे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत मोठे यश मिळवले आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल ४० कोटींचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले पाणी प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेबाबत अनेक वर्षे पाठपुरावा केला जात होता. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न कायमच रखडलेला होता. मात्र, आ. राजू खरे यांनी सत्ता बदलताच या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आणि केवळ काही महिन्यांतच मोठे यश मिळवले.
शेतकऱ्यांचा विजय – आ. खरे यांचा धडाकेबाज पाठपुरावा!
दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी शेटफळ ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. यानंतर अवघ्या दोन दिवसांत, २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट लेखी मागणी केली.
आमदार खरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात थेट ४० कोटींची तरतूद मंजूर केली! त्यामुळे मोहोळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न सुटणार असून, शेतीला आता नवा उजाळा मिळणार आहे.
जनतेत उत्साह – आमदार खरे यांचे सर्वस्तरांतून कौतुक!
मोहोळ तालुक्यातील शेतकरी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी आमदार खरे यांचे अभिनंदन केले आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या योजनेसाठी निधी मिळवून मोहोळच्या विकासासाठी नवा मार्ग मोकळा केल्याबद्दल आमदार खरे यांचे कौतुक होत आहे. “शेतकऱ्यांचा हक्काचा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निर्धार होता. हा निधी मंजूर झाल्याने हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. हा विजय संपूर्ण शेतकरी वर्गाचा आहे!”– आ. राजू खरे
मोहोळसाठी सुवर्णसंधी – सिंचन सुविधेत होणार क्रांती!
या योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील सिंचन सुविधा सुधारतील, पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल, तसेच शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही हा निधी मंजूर करताना मोहोळच्या विकासाला सरकार पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासन दिले आहे.
आ. राजू खरे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले आहेत. मोहोळच्या जनतेसाठी ही योजना म्हणजे विकासाची नवी पहाट असून, आ. राजू खरे यांच्या धडाडीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे.







