सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज लोहार यांनी निराधार वयोवृद्ध जिजाबा दळवी यांच्यावर स्व खर्चाने अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या समाज कार्याबद्दल कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिजाबा दळवी हे गेल्या काही वर्षापासून वडूज येथील स्मशान भूमी येथे राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सूरज लोहार यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर लोहार यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली. दरम्यान त्यांना कोणीच वारस नसल्याने ते निराधार असल्याची माहिती लोहार यांना समजली.
तेव्हा पासून त्यांनी मयत जिजाबा दळवी यांचा सांभाळ केला. मात्र गेले अनेक दिवसापासून मयत दळवी यांची तब्येत खालावली असल्याने त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी सुरज लोहार यांनी घेतली. मात्र प्रकृती खालावत असल्याने त्यांचे निधन झाले. निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी सूरज लोहार यांनी वडूज नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला मात्र प्रशासनाकडून कोणतीच जबाबदारी घेण्यात आली नाही.
दरम्यान कोणताच विचार न करता सूरज लोहार यांनी आपले मित्र गणेश लोहार , पवन नागावकर , निलेश लोहार, आदित्य लोहार, प्रथमेश लोहार , विष्णू लोहार, विशाल लोहार , अविनाश लोहार , मन्सुर पटेल यांना संपर्क साधून अंत्यविधी करण्याची तयारी केली. मित्रांची साथ मिळाल्याने त्यांनी अंत्यविधी साठी लागणारे साहित्य जमा केले.
वडूज नगरपंचायतची शववाहिका बोलावून वयोवृद्ध दळवी यांना येथील स्मशान भूमी मध्ये नेण्यात आले. तदनंतर स्वतः सूरज लोहार यांनी मयत दळवी यांना अग्नी दिली. सूरज लोहार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आज निराधार वयोवृद्ध व्यक्तीच्या अंत्यविधी साठी स्वतः पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तर मयत दळवी हे गेल्या अनेक वर्षापासून स्मशान भूमी मध्ये राहून त्याठिकाणी येणाऱ्या लोकांना सहकार्य करण्याचे काम करीत होते अशी माहिती सुरज लोहार यांना मिळाल्यानंतर लोहार कुटुंबीयांनी त्यांचा सांभाळ केला होता.







