नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खान अखेर पोलिसांच्या ताब्यात

मास्टरमाइंड फहीम खान

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. फहीम खान नावाच्या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

 

नागपूर शहरातील सोमवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एफआयआरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम शमीम खान याने जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हाच फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता. ३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून, त्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे पूर्वनियोजित कटकारस्थान रचण्यात आले होते. यात इतर अनेक संशयितांचीही भूमिका असण्याची शक्यता आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हिंसाचारानंतरही फहीम खानचे नाव थेट आरोपपत्रात नव्हते. मात्र, तपास पुढे जाताच त्याची संलग्नता स्पष्ट झाली. सोमवारी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले होते. यानंतर फहीम खानने आपल्या ४० ते ५० समर्थकांना एकत्रित करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली होती. त्यांनी आंदोलनादरम्यान चादर जाळल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, रोजाच्या कारणास्तव संध्याकाळी ही गर्दी पांगली.

 

रात्री ८ वाजताच्या सुमारास महाल परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खानच्या नेतृत्वाखाली जमावाने दोन तासांहून अधिक काळ दंगल घडवली. या काळात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फहीम खान याने मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून आंदोलन छेडण्याचे काम केले. त्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. हिंसाचारादरम्यान अनेक वाहने फोडण्यात आली, तसेच काहींना जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हेही समोर आले आहे की, फहीम खानने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका मागणीसाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या समर्थकांना भडकवले आणि मोठ्या प्रमाणावर जमाव जमवण्याचे नियोजन केले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ६५ जणांवर नामजद गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६०० अज्ञात व्यक्तींवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असून, त्यातील ४६ जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अजूनही संचारबंदी लागू आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here