घरासमोर झाडझुड करणार्‍या महिलेच्या मंगळसुत्र पळविण्याचा प्रयत्न; चोरटयांचा शोध सुरु

मंगळसुत्र पळविण्याचा प्रयत्न
(file photo)

हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : येथील भागात रविवार दि.३० मार्च रोजी पहाटे सात वाजण्याच्या सुमारास घरासमोर झाडझूड करणार्‍या महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून दुचाकीवरील तीन चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

 

 

वसमत शहरातील बालाजी नगर भागात पुष्पाबाई अवचार यांचे घर आहे. आज पहाटे सात वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोरील अंगणात झाडझूड करीत होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढले. मात्र चोरट्यांना मंगळसूत्र तुटलेच नाही. प्रसंगावधान राखत पुष्पाबाई यांनी आरडा ओरड सुरु केली. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक मदतीसाठी धाऊन आले. मात्र नागरीक येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धुम ठोकली.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार काशीनाथ भोपे, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरात माहिती घेतली. त्यानंतर काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एका दुचाकीवर तिघे जण आल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. दुचाकीवर येऊन मंगळसुत्र चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांची माहितीही घेतली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here