नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : सिडकोमधील परिसरामध्ये छत्रपती संभाजी स्टेडियम परिसरामध्ये केवळ एका रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झाल्याचा प्रकार समोर आलाय. जास्त किंमतीने सिगरेट का विकतो? असा जाब विचारून मद्यपी ग्राहकाने टपरीतील साहित्याची नासधूस केल्याच्या रागातून टपरी चालकाने काठीने केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूला रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे यांची टपरी आहे. आज बुधवारी दुपारी एक मद्यपी ग्राहक सिगरेट पिण्यासाठी टपरीवर आला. यावेळी १० रुपयांची सिगरेट ११ रुपयांना का दिली? याचा जाब विचारून ग्राहकाने टपरी चालकाच्या टपरीतील साहित्याची नासधूस करत शिवीगाळ केली.
याचा राग आल्यानं टपरी चालकाने ग्राहकाला काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल भालेराव असं मृत्यू झालेल्या ग्राहकाचं नाव असून मारहाणीच्या या घटनेत यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.







