शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार

जलव्यवस्थापन

कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर जावेद देवडी) : जलव्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग, तज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटांच्या प्रतिनिधींनी केला.

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शासकीय विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हात्रे, प्रमुख वक्ते डॉ.अनिलराज जगदाळे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.उदय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, अशोक पवार, देवाप्पा शिंदे उपअधीक्षक अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पाच जलकलशांचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांचे पाणी पाच कलशांमध्ये आणण्यात आले होते. यामध्ये पंचगंगा, वारणा, तम्रपर्णी, दूधगंगा, हिरण्यकेशी या नद्यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञाही देण्यात आली.

प्रास्ताविकामध्ये अभिजीत म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून येणाऱ्या पंधरा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रत्यक्षात कृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून जलव्यवस्थापनाला गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 4 मोठे, 12 मध्यम, 56 लघू प्रकल्प असून 302 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. जिल्ह्यात एकुण 7.68 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र असून पाटबंधारे विभागाकडे 3.24 लाख हेक्टर सिचंन क्षेत्र आहे. यातील प्रत्यक्षात 2.84 लाख हेक्टर भिजते, यामध्ये येत्या काळात वाढ करून ते 100 टक्के करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

 

प्रमुख वक्ते डॉ.अनिलराज जगदाळे यांनी बोलताना आजच्या काळात अभियांत्रिकीचा वापर करून जलव्यवस्थापन केले जात असल्याचे सांगितले. पाणी साठवणे आणि सिंचनला देणे, उद्योगांना देणे असे एकांगी जलव्यवस्थापन होत असल्याचे ते म्हणाले. एखाद्या भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यास लागणे म्हणजेच जलव्यवस्थापनातील चूक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही ठिकाणी जल व्यवस्थापन प्रक्रियेत अतिक्रमण, प्रदुषण होत असेल तर ते वेळीच रोखले पाहिजे. आज सर्वच शहरातील पाणी वापरात 50 टक्के गळती असते. म्हणून व्यवस्थापन म्हणजे वेळच्यावेळी विविध उपाययोजना राबवून पाण्याचे नियोजन करणे होय असे ते यावेळी म्हणाले. पाणलोट हा मुद्दा जलव्यवस्थापनात महत्त्वाचा घटक आहे. व्यवस्थापनात संपुर्ण नदीचे खोरे असावे असे सांगून त्यांनी विविध उदाहरणातून पाण्याचे व्यवस्थापन पटवून दिले. आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेचा वापर करून जुन्या जल व्यवस्थापन सुविधांचा अभ्यास करून शाश्वत जल व्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थितांना पटवून सांगितले.

पर्यावरण तज्ञ डॉ. उदय गायकवाड यांनी रंकाळा तलाव, कळंबा येथून पाणी पुरवठा अशा दीडशे वर्षापुर्वीच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून तेवढ्या गुणवत्तेच्या व शाश्वत योजनांची अंमलबजावणी व्हावी असे मत व्यक्त केले. संपुर्ण जिल्ह्यातच पाणी व्यवस्थापनाची गरज असून पाण्याचा ताळेबंद तयार व्हावा असेही ते म्हणाले. अलीकडील काळात दुर्गम भागातील नैसर्गिक पाण्याचे झरे बंद होत आहेत, पाऊस कधी जास्त तर कधी कमी पडतो, त्याच्या वेळाही बदलत निघाल्याने बदलत्या वातावरणाचा विचार करुन जलव्यवसथापनातही बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील साखर कारखाने, उद्योगांनी झिरो लिक्वीड डीस्जार्ज धोरणातून पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर केला पाहिजे असे सांगून 1902 सालच्या छत्रपती शाहू महाराजांच्या दुष्काळावरील जाहिरनामा आजही जलव्यवस्थापनाचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे सांगितले.

शेतकरी गटाचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शेतकरी आणि प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास जल व्यवस्थापन शक्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे प्रसारण दाखविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here