पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.
नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.







