कळवा पोलिसांची धडक कारवाई – कोणताही ठोस पुरावा नसताना दरोड्याचा गंभीर गुन्हा उघडकीस

कळवा पोलिसांची

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : कळवा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दरोड्याच्या अतिगंभीर गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ साक्ष, तांत्रिक तपास व कौशल्याच्या आधारे आरोपींना अटक करून १३ लाखांच्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

 

भिवंडीतील फळविक्रेते रियाज इब्राहीम पठाण (वय ५१) हे दिनांक १२ एप्रिल रोजी वाशीला निघाले असताना खारेगाव टोलनाका ते मुंब्रा दरम्यान निर्जन रस्त्यावर चार अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवत तब्बल तेरा लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी कळवा पो.स्टे. येथे गु.र.नं. ३१६/२०२५ भादंवि कलम ३०९(४), ३१०(२), १२६(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जबाबदारी पो.नि. विठ्ठल नावडे, पो.नि. अनिल गायकवाड, सपोनि. ज्ञानेश्वर घोडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकावर सोपवण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी नाशिक-मुंबई महामार्गासह घटनास्थळी येणाऱ्या-जाणाऱ्या १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. साक्षीदारांची विचारपूस केली,तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून अत्यंत कौशल्याने तपासाची दिशा ठरवली. त्यातून फैजानअली अब्दुल सत्तार अन्सारी (वय ४१) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत तीन साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार पुढील दोन आरोपी विवेक विलास वाघमोडे (वय २२), रा. चिंचघर, कुडूस, मयुर राजेंद्र पाटील (वय २२), रा. चिंचघर पाडा, कुडूस यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ₹५,२५,८५०/- रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेल्या ₹१,६०,०००/- किंमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ₹६,८५,८५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईसाठी मा. पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कारवाईत वरिष्ठ पो.नि. अशोक उतेकर, पो.नि. विठ्ठल नावडे, पो.नि. अनिल गायकवाड, सपोनि. ज्ञानेश्वर घोडे व त्यांचे सहकारी अंमलदार – वैभव जोशी, प्रदीप शिंदे, महादेव हजारे, जगदीश न्हावळदे, स्वप्नील खपाले, उदय कोरे, बुधे, माळी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
कोणताही स्पष्ट पुरावा नसताना, तांत्रिक चातुर्य व चिकाटीच्या जोरावर कळवा पोलिसांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणत ठाणे पोलीस दलाच्या तपास क्षमतेचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. पुढील तपास सपोनि. ज्ञानेश्वर घोडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here