जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सामान्य जनतेच्या अडचणींना तत्काळ न्याय मिळावा यासाठी ‘स्व-समाधान शिबिरे’ ही शासनाची एक सकारात्मक पावले आहेत. प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे,” “समाधान शिबिरे ही केवळ एक औपचारिकता नसून, ती जनतेच्या विश्वासाचे बळ आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याने नागरिकांचे समाधान होईपर्यंत कटिबद्ध राहावे. अधिकाऱ्यांच्या सेवाभावातूनच लोकांचे सरकारबद्दलचे विश्वास वाढेल. हे उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी संकल्पनेची आधुनिक प्रतिकृती आहेत,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाळधी येथे केले.
पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरात विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांना थेट वितरित करण्यात आले. शेतकरी, महिला, विद्यार्थी, गरजू नागरिक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
पाळधी येथे आयोजित समाधान शिबिरा’त विविध योजनांअंतर्गत नागरिकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करून थेट लाभ देण्यात आले. या शिबिरात एकूण शासकीय दाखले ८८५ – जात, उत्पन्न, शैक्षणिक, नॉन क्रिमीलेयर आदी प्रकारचे शासकीय दाखले शिबिरात तात्काळ तयार करून संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. ‘सुलभ शेतकरी योजना’ अंतर्गत – सातबारा सुधारणा – तालुक्यातील १३५९ गट व पाळधी मंडळातील २५२ गटांमध्ये ‘तुकडा’ शेरा कमी करून सुधारित सातबारा उतारे शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले.‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत वारस नोंदणी – ४३७ मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन फेरफार दाखले तयार करून शेतकऱ्यांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यात आली. ‘संजय गांधी निराधार योजना’चा- डीबीटी लाभ – एकूण १६,१७६ लाभार्थ्यांपैकी 14000 जणांना थेट बँक खात्यात (DBT) लाभ हस्तांतरित करण्यात आला,उर्वरित 2000 लाभार्थी यांचे DBT कामकाज आज पाळधी येथे सुरू आहे. यामुळे योजनेंतर्गत लाभाची कार्यक्षम अंमलबजावणी साधली गेली. महिला शेतकऱ्यांना यांत्रिक मदत – राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत पथराळ बुद्रुक येथील महिला शेतकरी मुक्ताबाई अर्जुन सूर्यवंशी यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १.२५ लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. घरकुल योजनेंतर्गत मोफत वाळू वाटप – शासनाच्या निर्णयानुसार धरणगाव तालुक्यातील ४,७३२ लाभार्थ्यांना मोफत प्रासवांसाठी वाळू देण्यात येणार असून, शिबिरात प्रारंभी २० लाभार्थ्यांना वाळूचे वितरण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सेवा व प्रमाणपत्रे देऊन प्रशासनाने आपली कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता अधोरेखित केली.
या शिबिराच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा जनतेच्या दारी पोहोचली असून, लोकांनी आपापल्या अडचणी प्रशासनासमोर मांडून तात्काळ निर्णय घेतले. प्रशासन आणि जनतेतील संवाद सशक्त करण्याचा आणि विश्वास अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, तालुकाप्रमुख माजी उपसभापती डी. ओ.पाटील, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.डी. पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, माजी सरपंच अरुण पाटील प्रशांत झंवर, आबा माळी, कल्पेश कोळी महेश शिंपी, समाधान माळी,अनिल माळी परिसरातील सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल, कृषी, पंचायत राज व विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







