जर्मनीतील उद्योगांसाठी एमआयडीसीत ५०० एकर भूखंड राखीव ठेवणार
मुंबई (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मिती वाढावी यासाठी राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौ-यावर आहेत. आज (दि.७) जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थित राहून, त्यांनी जर्मनीतील उद्योगपती व व्यावसायिकांशी संवाद साधला.हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी होती. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, ना.सामंत म्हणाले की, जर्मनीतही मराठी माणूस महाराष्ट्राची संस्कृती घेऊन जगत असल्याचा अभिमान आहे. जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असून, अनिवासी महाराष्ट्रीयन नागरिकांसाठीही (NRM) धोरणाअतंर्गत १०० एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायासाठी नव्या संधीचे दरवाजे उघडण्यासोबतच, रोजगानिर्मितीसाठी व औद्योगिक विकास करण्याकरिता जर्मनीतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रकल्पांचं महाराष्ट्रात मनापासून स्वागत केलं जाईल. त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सुविधा दिल्या जातील. तसेच जर्मनीतील मध्यम उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी जर्मनीतल्या मराठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.







