१४ लाखांच्या १२ दुचाकींसह दुचाकी चोरटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकी चोरटे

धुळे (महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर पवन मराठे) : अल्पदरात महागडी दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिरपूर शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातून १३ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या १२ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी जळगाव, धुळे, नंदुरबार व मध्यप्रदेशातून चोरी करण्यात आल्या आहेत.

शिरपूर शहर पोलिस ठाण्यात विक्रमसिंग राजपुरोहित यांनी आपली स्पोर्टस् बाईक चोरी झाल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होवून तपास सुरू होता. कुवे फाटा येथे काही संशयीत चोरीची बाईक विकत असल्याची माहिती शिरपूर पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली. त्यांनी याबाबत डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी बाईकवर येताच त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडील बाईकबाबत शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन झाले. पोलिसांनी या प्रकरणी अनिल जोबा पावरा (रा.शिंगावे, ता.शिरपूर) व दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा (रा.मोयदा, ता.शिरपूर) यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींची विचारपूस केली असता शिरपूर शहर हद्दीतील पाच, शिरपूर तालुका हद्दीतील एक, शहादा हद्दीतील दोन, पानसेमल, जि.बडवाणी येथून एक तर भुसावळ, जि.जळगाव येथील बाजारपेठ हद्दीतून एक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे तर अन्य दुचाकींबाबत तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयाने 18 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी, शिरपूर पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे हवालदार राजेंद्र काकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटू साळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी व जितेंद्र अहिरराव आदींच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here