गुवाहाटी (वृत्तसंस्था) : गुवाहाटीहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटचं (एअरबस A321) इंधनाच्या तुटवड्यामुळे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं लागलं. यादरम्यान काहीकाळ विमानातील १६८ प्रवाशांची जीव टांगणीला लागला होता. चेन्नई विमानतळावर लँडिंग करताना ‘गो अराउंड’ म्हणजेच अचानक लँडिंग थांबवून पुन्हा आकाशात झेप घेण्याचा निर्णय पायलटनं घेतला. त्यानंतर लगेचच “Mayday” कॉल देण्यात आला. त्यामुळे काहीवेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
गुवाहाटीहून दुपारी ४.४० वाजता उड्डाण घेणाऱ्या या विमानाचं चेन्नईमध्ये रात्री पावणेआठ वाजता लँडिंग होणं अपेक्षित होतं. मात्र लँडिंग गियर रनवेवर टेकल्यावर काही क्षणातच पायलटनं गो अराउंड केलं. विमान बेंगळुरू विमानतळापासून अवघ्या ३५ मैलांवर होतं आणि त्याक्षणी पायलटनं मेडे कॉल दिला
मेडे कॉल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलनं तत्काळ ग्राउंड स्टाफला सतर्क केलं. वैद्यकीय पथक आणि अग्निशमन कर्मचारी रनवेवर तैनात करण्यात आले. अखेरीस रात्री साडेआठ वाजता विमान बंगळुरू विमानतळावर सुरक्षित उतरलं. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.







