नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : प्रवासाचा वेळ कमी करणारा म्हणून प्रसिध्द असलेल्या समृध्दी महामार्गाचा आता अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठीही वापर होऊ लागला आहे. ग्रामीण पोलिसांनी समृध्दी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद केली. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेत ३६ लाख, ३९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे समृध्दी महामार्ग परिसरात त्यांनी सापळा रचला.
समृध्दी महामार्गाने नागपूरकडून मुंबईकडे दोन चारचाकी वाहनांमधून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार होती. ही तस्करी रोखण्यासाठी चार पथके सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील समृध्दी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आली. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने संशयित दोन मोटारी भरधाव येतांना दिसल्यावर पथकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका मोटारीने वळण घेत नागपूरच्या दिशेने परत फिरली.
एक मोटार मात्र मुंबईच्या दिशेने गेली. दोन्ही मोटारींचा पोलीस पथकाने पाठलाग करुन कोकमठाण टोलनाक्याजवळ एक मोटार अडवली. दुसऱ्या मोटार चालकाने शिवडे शिवारात मोटार थांबवून पलायन केले. दोन्ही मोटारींमधून पोलिसांनी २४ लाख, २८ हजार ५८० रुपये किंमतीचा १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा, वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटारी, तीन भ्रमणध्वनी, १५ हजार रुपये रोख असा ३६ लाख, २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी भारत चव्हाण (३५), तुषार काळे (२७) आणि संदीप भालेराव (३२) तिघेही रा. नेवासा या तीन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी एक संशयित सुनील अनार्थे (रा. शिर्डी) हा फरार झाला. फरार झालेला संशयित नाशिकच्या टिप्पर गँगचा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. तो नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार आहे. कारवाई दरम्यान जंगलाचा आधार घेऊन जंगलातून तो फरार झाला. नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







