धुळे (उपसंपादक प्रशांत सुर्यवंशी) : आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. याबाबत वाहतुक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी आदेश काढलेत.
आता वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. आणि जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढलेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो.
वाहतूकीचे नियम मोडले की पावती फाडली जाते. परंतु अनेकदा चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. त्याविरोधात अपिल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारण आता दंडाची रक्कम काही हजारात गेली आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आधी हे पर्याय अवलंबा. थोडा त्रास होईल परंतू ते चलन रद्द होईल.







