छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सुजित खंडाळे) : पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारी व्यक्ती पकडली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरात गुटखा माफियांच्या मनात पोलिस कारवाईची धडकी भरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हेशाखेचे पोउनि एन.ए.पाटवदकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असतांना त्यांना गोपनीय खबर मिळाल्यावरून, समृध्दी जंक्शन माळीवाडा जवळील करोडी टोलनाक्याच्या बाजूला संशयित गाडी (डीडी ०१ जी ९०९२) थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बनेसिंग बाबूलाल कटारिया (वय३७, रा.बडागाव, ता.नलखेडा.जि.अगर) सांगितले. गाडीत काय असल्याची चौकशी केली असता त्याने गाडीत गुटखा असून, तो अमरावती येथून मुंबईला नेत असल्याचे सांगितले.
सोबत असलेल्या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिळालेल्या मालाचा पंचनामा करून ५६ लाख २५ हजार रुपये किंमतीचा बाजीराव सुगंधित पानमसाला गुटख्याच्या ७५ गोण्या, ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मस्तानी जर्दा व वाहतूक करण्यासाठी वापरलेली २० लाख रुपये किंमतीची आयशर गाडी असा एकूण ८३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर इसमाविरुध्द दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संभाजी पवार, गुन्हे शाखा पोउपनि नवनाथ पाटवदकर, पोह सतीश हंबर्डे, पोअं संतोष भानुसे, शैलेश आस्कर, यशवंत गोबाडे व अन्न – सुरक्षा महामंडळ अधिकारी यांनी यशस्वीरित्या केली आहे.







