परभणी (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथील बसस्टँड रोडवरील ज्ञानेश्वर ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानात बुधवारी (दि.२३) मोठी चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून २० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिन्यांवर हात साफ केला आहे.
कुंभार पिंपळगाव येथील सोने चांदीच्या दुकानातून ५ तोळे नाकातील सोन्याच्या ३ लाख ७५ हजार रुपयांच्या मोरण्या, २ तोळे १ लाख ५० हजार किंमतीचे सोन्याचे कुडके, ७ ग्रॅम कानातील ५२ हजार ५०० किंमतीचे हुजुर, एक तोळे ७५ हजार किमतीचे कानातील सोन्याचे झुंबर, दोन तोळे १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे गळ्यातील नेकलेस, ६ ग्रॅम ४८ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे वेल, १२ ग्रॅम ९६ हजाराचे सोन्याचे पेंडल, एक तोळा ८० हजाराची सोन्याची मोड याशिवाय मोठा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, याप्रकरणी ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.







