मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वांद्रे पश्चिममध्ये धावत्या ऑटो रिक्षात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धारदार वस्तूने धमकावून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेत आरोपी असलेल्या अफाक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास १६ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. एसव्ही रोडवरील बोस्टन हॉटेलजवळ आरोपी अफाक खान याने जबरदस्तीने रिक्षा थांबवली आणि रिक्षा चालक नाही म्हणत असतानाही तो त्या रिक्षामध्ये बसला. रिक्षा मध्ये बसताच अफाकने थोडं पुढे उतरायचं असल्याचं खोटं कारण सांगून रिक्षाचालकाला रिक्षा सिग्नलच्या पुढे घेऊन जाण्यास भाग पाडले.
रिक्षा सिग्नलच्या पुढे जाताच आरोपीने विद्यार्थिनीला आणि रिक्षाचालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर विनयभंग केला. पुढच्या सिग्नलवर रिक्षा थांबताच आरोपीने रिक्षातून पळ काढला . घाबरलेल्या पीडितेने मात्र कॉलेजला जाण्याऐवजी घरचा रस्ता गाठला. पीडितेने घडलेली घटना कुटुंबाला सांगितली असून कुटुंबीयांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, आरोपी तिच्या ओळखीचा नसून तो जबरदस्ती रिक्षामध्ये घुसला. रिक्षाचालकाने आणि तरुणीने नकार देऊनही संबंधित आरोपी रिक्षामध्ये बसला. आरोपीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत पीडितेला धमकावलं आणि तिच्यावर विनयभंग केला असल्याचं पोलिसांनी म्हटलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







