जगन्नाथपुरी (ओडिसा) : येथील जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. या मंदिरात देखील वर्षभर गर्दी असते.हे जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी दिल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे पुरीमध्ये मोठी खळबळ उडाली. या धमकीमुळे येथील भाविकांमध्येही भितीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे.
जगन्नाथ मंदिराच्या बाहेर परिक्रमा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरिटेज कॉरिडॉरजवळील दुसऱ्या एका मंदिराच्या भिंतीवर ओडिया आणि इंग्रजी अशा दोन भाषेत भिंतीवर एक संदेश लिहित धमकी आली आहे. भिंतीवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करतील आणि ते नष्ट करतील. तसेच कॉल करा, अन्यथा सर्वकाही उद्ध्वस्त होईल”, असे त्या ठिकाणी लिहिलेल्या संदेशात म्हटले.
मंदिराच्या भिंतीवर काही फोन नंबर देखील लिहिल्याचे आढळले. तसेच त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी असे शब्दही लिहिल्याचे आढळले. त्यामुळे या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ पुढील तपास सुरू केला आहे. या बरोबरच हेरिटेज कॉरिडॉरच्या परिसरातील काही सजावटीचे दिवे देखील अचानक खराब झाल्याचे आढळले. सजावटीचे दिवे अचानक खराब कसे झाले? याबाबतही आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
जगन्नाथ मंदिर परिसरात असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांकडून बरेच वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांबाबत आणि मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.







