नांदुरा रेल्वे गेट रस्त्याची दुरावस्था; जनतेच्या हालअपेष्टा, आंदोलनाचा इशारा

नांदुरा रेल्वे

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी सचिन जगदाळे) : नांदुरा शहरातील शिवाजीनगर वार्ड क्रमांक तीनमधील मध्य रेल्वे गेटजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर झालेल्या गड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नांदुरा नगरपरिषदेकडे वारंवार अर्ज करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. स्थानिक नागरिक व विविध पक्षांनी निवेदन देऊनही काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने नगरपरिषद सीओ यांना निवेदन देण्यात आले व आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन हालचालीस लागले. त्यानंतर नगरपरिषदेकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे गेट बऱ्याच वेळा बंद असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. मोठ्या वाहनांना सहज मार्ग मिळतो, परंतु मोटरसायकल, कार व पायी जाणाऱ्यांना गाड्यांच्या घसरगुंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरीसुद्धा शासन आणि प्रशासन या रस्त्याकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याच्या गड्डे बुजविण्याच्या कामावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सागर भाऊ जगदाळे व भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद भाऊ हिवाळे हे सामाजिक कार्यकर्ते स्वतः हजर राहून जनतेच्या समस्येला आवाज दिला. नागरिकांची मागणी आहे की तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी डांबरीकरण करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here