रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जलसमाधी

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी सचिन जगदाळे) : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प बाधित करणवाडी ते अडोळ खुर्द गावांदरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. अनेक वर्षांपासून रस्ता न झाल्याने ग्रामस्थ व शेतकरी प्रचंड त्रस्त होते.

या आंदोलनादरम्यान विनोद पवार हे शेतकरी पूर्णा नदीत उतरले. मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, “अनेक वेळा अर्ज, निवेदन करूनही शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. ही घटना म्हणजे शासनाच्या उदासीनतेची शोकांतिका आहे.” या घटनेनंतर रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here