नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जिल्ह्यातील बागलाणमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. क्षुल्लक वादातून त्यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात माजी सरपंच गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गावातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये रवाना करण्यात आले आहे.
मुन्ना सूर्यवंशी असे माजी सरपंचाचे नाव आहे. ते नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरूम टाकण्यात येत होते. मुरूम वाहतूक सुरू असताना, ‘आम्हाला का विचारले नाही?’ या कारणावरून वाद झाला.
या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीनं माजी सरपंच सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने सटाणा ग्रामीम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये रवाना करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच नाशिकमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.







