शिरपूर (प्रतिनिधी पवन मराठे) | देवपूरमध्ये सराफा व्यावसायिक विनय जैन यांच्यावर गोळीबार करून साडेतीन किलो सोने लुटल्याप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. हजारो सीसीटीव्ही तपासून आरोपींचा माग काढला असता ते उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ तुरुंगात अटकेत असल्याचे समोर आले. त्यानंतर मोहंमद शहरेयार खान व दिलशान शेख यांना ताब्यात घेऊन २४.५१ लाखांचे सोने, कार व गावठी पिस्तूल जप्त केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ शहादा कडून आलेल्या बसमधून विनय मुकेश जैन आणि त्यांचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी उतरल्यावर एक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर तोंडाला काळे मास्क व हेल्मेट घालून पिस्टलचा धाक दाखवून, विनय जैन यांना गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने फायर करुन त्यांच्याजवळील ३५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सोन्याच्या पावत्या असलेली काळ्या रंगाची बॅंग हिसकावून पळून गेले होते. विनय जैन यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक धुळे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. आरोपींची कोणतीही ओळख पटत नसल्याने, शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमे-यांचा आधार घेऊन त्यांची तपासणी केली असता, संशयित वाहनांचे नंबर मिळविण्यात आले. गुन्ह्यातील आरोपी मुंबईकडून आल्याचे निष्पन्न झाले. मुंबई येथे पोलीस पथकाने शोध घेतला असता, ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालवणारे उत्तरप्रदेशातील प्रतापगढ येथील राहिवाशी असलेल्या आरोपींना हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
या आरोपींचा मुंबईत शोध घेतला असता, ते उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याने, उत्तरप्रदेश प्रतापगढ येथून मोहमंद शहरेयार मोहंमद इबरार (वय २४, रा.ग्राम बहरापूर, थाना मांधाता, ह.मु.वडाळा, मुंबई), दिलशान इमरान शेख (वय २१, रा.यहियापूर, थाना दिलीपपूर, ह.मु. सुंदरबाग, कुर्ला, मुंबई) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले. या दोन्ही आरोपी प्रतापगढ येथे खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रतापगढ पोलीस व न्यायालयाशी पत्रव्यवहार करुन या आरोपींना प्रतापगढ येथून ट्रान्सफर करुन नमूद गुन्ह्यात दि. २३ ऑगस्टला अटक करण्यात आले होते. या दोन्ही आरोपींकडे तपास करत असतांना त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याजवळून २६२.८०० ग्रॅम वजनाचे रु.२४,५१७०० किंमतीचे सोन्याचे दागिने, पांढरा रंगाची मारुती सुझूकी कंपनीची स्विफ्ट कार (एम.एच. १५, इबी ४५१६), गावठी पिस्टल त्यास स्टील बॉडी असलेल्या व काळे रंगाचे प्लॅस्टीक कव्हर असलेली स्टील मॅगझीन, कारला लावण्यासाठीच्या वेगवेगळ्या बनावट दोन नंबर प्लेट, चेहरा झाकण्यासाठी पांढरा आणि काळा रुमाल, मास्क, स्टीलचे धारदार टोकदार कटर जप्त करण्यात अाले.
याप्रकरणी अधिक चौकशी करता आरोपींनी वरील गुन्ह्यासोबतच मांधाता, जेठवारा, सोरांव, कोतवाली नगर, पट्टी, देल्हूपूर येथील केलेल्या गुन्ह्यांची कबूली िदली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि श्रीराम पाटील, पोउनि चेतन मुंढे, सहाउिन सतीश जाधव, पोहवा राहुल सानप, आरीफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर, पोकॉं मयुर पाटील तसेच सहाय्यक पोउनि संजय पाटील, पोकॉं.अमोल जाधव, चापो.हवा.कैलास महाजन यांनी यशस्वी केली आहे.







