इंदापूर (प्रतिनिधी) । इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी संशोधन स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी आविष्कार कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अविष्कार स्पर्धेचे महाविद्यालयीन, विभागस्तरीय, विद्यापिठीय तसेच राज्यपातळीवर आपल्या नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे सहभाग वाढवून राष्ट्रीय हित साधावे यासाठी संलग्नित महाविद्यालयांमधून अविष्कार स्पर्धा आयोजन व आविष्कार स्पर्धेत सहभाग घेण्याच्या दृष्टीने पदवी, पदव्युत्तर, आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गुळीग, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे डॉ. रमेश देवकाते , टी.सी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण मगर उपस्थित होते. कार्यशाळेचे संयोजन महाविद्यालयातील शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले होते.
उद्घाटनप्रसंगी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी अविष्कार सारख्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समाजोपयोगी नवकल्पनांना मूर्त रूप देत मूलभूत संशोधनाची उर्मी टिकून ठेवत संशोधन प्रकल्प सादर केले पाहिजेत असे आवाहन केले.
प्रास्ताविक शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास बुवा यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या नियोजनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेहमीच संशोधनात आघाडी घेत संलग्नित महाविद्यालयांमध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे आणि संशोधनाची परंपरा रुजावी या दृष्टीने 2006 पासून राज्यामध्ये सुरू झालेल्या अविष्कार स्पर्धेत आपल्या संलग्नित महाविद्यालयातील पदवी, पदव्युतर आणि संशोधन करणारे विद्यार्थी त्याचबरोबर प्राध्यापक यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी अविष्कार स्पर्धेची पार्श्वभूमी विशद करीत अविष्कार स्पर्धेत आपला ठसा कसा उमटवता येईल याचे विवेचन केले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी तसेच संशोधन करत असलेल्या प्राध्यापकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा. डॉ. रमेश देवकाते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. यात विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण विषय व प्रकल्प घेऊन कसे सहभागी होता येईल तसेच आपण जे सभोवताली उघड्या डोळ्याने पाहतो, ज्या समस्या आपल्याला जाणवतात त्या सोडविण्यासाठी नवकल्पनांना वाव देऊन सादरीकरण केले पाहिजे. डॉ. देवकाते यांनी अविष्कार स्पर्धेचे उद्देश, महाविद्यालयीन पातळीवरती त्याची अंमलबजावणी, स्पर्धेत सहभागी होताना विद्यार्थ्यांचे विषय, तसेच प्रकल्प आणि त्यांचा दृष्टिकोन कसा असावा याबद्दल बोलताना व्यावहारिक अडचणींवर आपण मात करत अविष्कार स्पर्धेत केवळ अडचणी न मांडता त्यांची उकल करण्याचे, उपाय शोधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. विज्ञान शाखेतील विद्यार्थी कोणकोणत्या समस्या मांडू शकतात व त्यावर कशाप्रकारे उपाय सुचविता येतील यासंदर्भात त्यांनी अनेक उदाहरणे देत व संदर्भ सांगत विवेचन केले.
दुसऱ्या सत्राचे वक्ते बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण मगर होते. त्यांनी आपल्या पीपीटी सादरीकरणातून अविष्कार स्पर्धेला सामोरे जाताना कोणते नियम व अटी असतात, संशोधन प्रकल्पांची मांडणी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अविष्कार स्पर्धेत भाग घेताना कोणकोणत्या विद्यापीठाने वर्गीकरण केलेल्या गटात सहभागी होऊ शकतो. शिवाय या स्पर्धेत पोस्टर द्वारा आपले प्रकल्प मांडताना त्या पोस्टरचे आकारमान, संशोधनाचे विधान, संशोधन सारांश व संशोधन पद्धती कशाप्रकारे प्रतिबिंबित झाली पाहिजे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. अविष्कार संशोधन स्पर्धा ही महाविद्यालयीन पातळीपासून तर राज्याच्या पातळीपर्यंत कशा स्वरूपात होते तसेच वेगवेगळ्या टप्प्यांवर बक्षिसे व शिष्यवृत्यांचे स्वरूप कसे असते याबाबत ही माहिती दिली. बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या याबरोबरच अविष्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे अनेक फायदे असतात ज्यामध्ये सहभागींमध्ये चिकित्सक आणि संशोधकीय दृष्टी वाढते. वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला मिळते तसेच बोलता येते. विविध क्षेत्रातील तज्ञांशी, मान्यवरांशी संवाद साधता येतो इत्यादी अनेक फायदे अविष्कार स्पर्धेत सहभागी झाल्यावर मिळतात त्यामुळे अशा स्पर्धांमधून प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग नोंदवून स्वतःचा तसेच देशाचाही उत्कर्ष साधावा असे आवाहन केले.
कार्यशाळेसाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गुळिग, प्रमुख वक्ते डॉ. रमेश देवकाते, प्रा. डॉ. अरुण मगर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. प्रशांत शिंदे, विविध विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे आभार प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. बबन साळवे यांनी केले.







