सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) । हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या बोरगाव (तालुका कोरेगाव) येथील तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव (वय ३२, सध्या राहणार श्री अपार्टमेंट, अहिरे कॉलनी, लक्ष्मीनगर, सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची टकले (ता. कोरेगाव) येथे गट नंबर १०० मध्ये ९० गुंठे शेत जमीन आहे. २३ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारदारांच्या वडिलांचे निधन झाले. तक्रारदारांची भाऊ-बहीण स्वतः तक्रारदार यांची नावे सातबारावर नोंद झाली होती. तक्रारदार यांच्या बहिणीचे विना मोबदला हक्क सोड पत्र व भावाच्या नावे नोंद सह दुय्यम निबंधकांसमोर करून देण्यात आली होती. या हक्क सोडपत्राची नोंद सातबारा सदरी करून देण्यासाठी तलाठी घाटेराव यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १००० रुपये रोख देण्याचे ठरले व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे चर्चेनुसार निश्चित झाले.
मंगळवारी (दि. ९) तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या निर्देशानुसार पोलिस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकाने तलाठी सजा परिसरात सापळा रचला. तलाठी घाटेराव यांना एक हजार रुपयाची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस हवालदार नितीन गोगावले, सत्यम थोरात, अजयराज देशमुख आणि निलेश राजपुरे यांनी ही कारवाई केली.







