धुळ्यात एमडी ड्रगची तस्करी करणारे दोघे जेरबंद; १७ लाखांचे ड्रग्स जप्त

एमडी ड्रग

धुळे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) । स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमधून एमडी ड्रगची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत राजस्थान व मालेगाव येथील प्रत्येकी एकास अटक करण्यात आली असून दोघांची चौकशी सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून मुंबई-आग्रा महामार्गावर एका कारमधून (क्रमांक जीजे १६ डीएस ०३१४) एमडी ड्रग्स घेऊन जळगावकडून धुळ्याकडे येत आहे. एनडीपीएस ॲक्टमधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले.
मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळील नवीन नागपूर सुरत महामार्गावर संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून सय्यद अतीक सय्यद रफीक (मालेगाव) व मजहर खान युसुफ खान (बासवाडा, राजस्थान) यांना जेरबंद करण्यात आले.
त्यांच्या अंगझडतीत सय्यद अतीककडून १०४ ग्रॅम वजनाचे एमडी पावडर (किंमत रु. १०.४० लाख) मिळाले. तसेच कार, तीन मोबाईल यांसह एकूण रु. १७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात एमडी ड्रगची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. हे ड्रग प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांच्या पार्टींमध्ये वापरले जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, धुळ्यातील संभाव्य खरेदीदार व तस्करीचे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकूर, प्रकाश सोनार, जगदीश सूर्यवंशी, अमोल जाधव यांनी यशस्वी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here