सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ऊसदर वाढीसाठी झालेल्या मोठ्या लढ्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धैर्य, चिकाटी आणि संघटनशक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹३५०० पर्यंतचा दर मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली. या संघर्षाचा परिणाम म्हणून प्रत्येक गावात जवळपास अतिरिक्त २ ते २.२५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यादा आले आहेत. हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विजय असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्याचे प्रतीक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
याच कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खरी अडचण बनलेल्या उसाच्या काटामारीचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला. गाव तिथे वजन काटा या स्वाभिमानीच्या अभियानाला पाठबळ देत शेतकऱ्यांचे वजन योग्य नोंदले जावे, अन्याय होऊ नये यासाठी नागाचे कुमठे ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःचा वजनकाटा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. “गाव तेथे काटा” या अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा मान कुमठेकरांनी घेतला असून ऊस काटामारीला रोखण्यासाठी हे मोठं पाऊल मानले जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ सध्या तालुक्यात जोमाने वाढत असून ५१ गावांमध्ये पदाधिकारी आणि बिलेधारी कार्यकर्ते तयार झाले आहेत. संघटनेची ताकद वाढणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींना थेट उत्तर मिळणे, आणि प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या अन्यायाविरोधामध्ये सर्वसामान्य युवक रस्त्यावर उतरू लागला आहे हे त्याचे लक्षण आहे असे मत ग्रामस्थनी व्यक्त केले
कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, “शेतीतील समस्या, ऊसाचा प्रश्न, वीज प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी — या सर्व गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे अत्यावश्यक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यासाठी सदैव तत्पर असेल.”
स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी राज्यकर्त्यांवर टीका करताना म्हटले,“राज्यकर्ते गावोगावी भांडण लावण्याचे राजकारण करतात. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून शेतीमधून प्रगती कशी करता येईल, आपल्या समस्या कशा सोडवता येतील यावर लक्ष केंद्रित करा. यासाठी स्वाभिमानीची चळवळ बळकट केली पाहिजे.”
कार्यक्रमात तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे, खटाव मान संपर्कप्रमुख शरद खाडे यांनीही आपल्या विचारांतून संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सभापती संदीप दादा मांडवे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, दिलीप मांडवे, संतोष मांडवे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळालेले यश टिकवण्यासाठी चळवळ आणखी बळकट करण्याचे आवाहन विविध पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी तालुका संघटक संतोष तुपे, युवा संघटक सुभाष जाधव, वडूज शहर उपाध्यक्ष संतोष पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. नागाचे कुमठेकरांचा हा पुढाकार शेतकरी स्वावलंबनाच्या नव्या दिशेचा प्रारंभ मानला जात असून स्वाभिमानी चळवळ आता अधिक व्यापक आकार घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.







