अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) । पारनेर महाविद्यालयातील एन.सी.सी ऑफिसर लेफ्टनंट भरत डगळे यांना महाराष्ट्र राज्य असोसिएट एन.सी.सी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड यांच्यामार्फत ‘बेस्ट असोसिएट एन.सी.सी ऑफिसर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एन.सी.सी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लेफ्टनंट भरत डगळे यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट नेतृत्वगुण, शिस्तबद्धता, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सेवाभाव निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. एन.सी.सी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅडेट्सना आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, महाराष्ट्र पोलीस तसेच इतर संरक्षण व शासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रेरित व मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध सेवांमध्ये देशसेवा करत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या परेड,रिपब्लिक डे कॅम्प , नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, थलसेना कॅम्प, आर्मी अटॅचमेंट कॅम्प तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पारनेर महादियालयाच्या एन.सी.सी विद्यार्थ्यांचा यशस्वी सहभाग घडवून आणण्यात लेफ्टनंट डगळे यांचा मोलाचा वाटा आहे. शिस्त, संघभावना, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांची रुजवणूक त्यांनी आपल्या कार्यातून केली आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य एन.सी.सी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना ‘बेस्ट असोसिएट एन.सी.सी ऑफिसर’ या पुरस्काराने सन्मानित केले. या सन्मानामुळे महाविद्यालयासह संपूर्ण पारनेर तालुक्याला गौरव प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. रविंद्र देशमुख, आय.क्यू.ए.सी चे समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. संजय गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. शाम घनघाव, प्रा. संदीप जमधडे , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एन.सी.सी कॅडेट्स यांनी लेफ्टनंट भरत डगळे यांचे अभिनंदन केले.







