भीमाशंकर देवस्थानात शिक्षिकेला सुरक्षारक्षकांकडून मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

ladies-marhan
File photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । भीमाशंकर (ता. खेड) येथील देवस्थान परिसरात सुरक्षा रक्षकांकडून एका शिक्षिकेसह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सात सुरक्षा रक्षकांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी माया हंबीर लंघे (वय ४८, रा. चंदननगर, पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, २४ डिसेंबर रोजी दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर देवस्थानातील राम मंदिर परिसरात ही घटना घडली. देवस्थान आवारात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहून फिर्यादी माया लंघे यांनी याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने सुरक्षा रक्षकांनी माया लंघे, त्यांचे पती हंबीर लंघे आणि मुलगा राजवर्धन यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करून फिर्यादींचा मोबाईल फोन जमिनीवर आपटून फोडण्यात आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये निळा शर्ट व काळे जॅकेट परिधान केलेली, कानात बाळी घातलेली एक व्यक्ती, तसेच चार पुरुष सुरक्षा रक्षक आणि तीन महिला सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.
मात्र, आरोपींची संपूर्ण नावे व इतर तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. घटनेच्या वेळी देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. खेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे खेड पोलिसांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here