पुण्यातील महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा संशयास्पद मृत्यू

deadbody
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात गेल्या २३ वर्षांपासून अध्यापन करणारे प्रा. डॉ. परदेशी हे शांत, संयमी, सुस्वभावी व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते.

गुरुवारी (दि. २५) खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिरगाव-तळेघर रस्त्यावरील मंदोशी गावाजवळ, भैरवनाथ मंदिर परिसरातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. माहितीनुसार, प्रा. परदेशी हे बुधवारी (दि. २४) दुपारी सुमारे ३ वाजता महाविद्यालयातील अध्यापनाचे काम आटोपून मोशी येथे जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. मात्र ते घरी न पोहोचल्याने सायंकाळी सुमारे ८ वाजता त्यांच्या पत्नीने सहकारी शिक्षकांकडे चौकशी केली. त्यानंतर शिक्षकांनी एकत्र येऊन शोधमोहीम सुरू केली. वाकी येथील एका हॉटेलमध्ये चहा घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले. मोबाईल बंद असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन विविध रुग्णालयांत चौकशी करण्यात आली. अखेर रात्री १.३० वाजता खेड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली.
मंदोशी येथील भैरवनाथ मंदिर परिसरात सायंकाळी मोटारसायकल, बॅग व चपला आढळून आल्याने पुजार्‍यांनी पोलिस पाटील व ग्रामस्थांना माहिती दिली. मोटारसायकल क्रमांकाच्या आधारे चाकण पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला. माहिती जुळल्यानंतर कुटुंबीय व सहकारी शिक्षकांना कळविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेतल्यानंतर रात्री सुमारे १२ वाजता मृतदेह हाती लागला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. खेड पोलिसांनी घटनास्थळावरून बॅग व मोबाईल ताब्यात घेतला असून, मृत्यूच्या कारणाबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here