जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) । महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा होमगार्ड दलाच्या वतीने आयोजित ‘वर्धापन दिन सप्ताह’ सोहळ्याची सांगता आज दि. २६ डिसेंबर रोजी उत्साहात झाली. जळगाव पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर शानदार संचलन परेडचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. त्यांनी संचलन परेडची मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी होमगार्ड्सच्या कार्याचा गौरव केला आणि होमगार्डच्या सुसज्ज प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी होमगार्ड हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक असून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात, असे गौरवोद्गार काढले.
७ ते १३ डिसेंबर या सप्ताह कालावधीत जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये:वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान , रुग्णालयात फळ वाटप आणि गरजूंना ब्लँकेट वाटप,रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर,शाळांमध्ये अग्निशमन व विमोचन प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती. आजच्या संचलन परेडमध्ये होमगार्डचे तीन प्लाटून आणि पोलीस विभागाचे तीन प्लाटून अशा एकूण सहा प्लाटूननी सहभाग घेतला. परेड कमांडर म्हणून श्री. रवींद्र ठाकूर यांनी नेतृत्व केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जवानांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणापुरे साहेब, संजय पाटील, विविध तालुक्यांचे समादेशक अधिकारी, होमगार्ड जवान आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अशोक नखाते यांनी केले, तर सूत्रसंचालन मदन रावते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







