जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जळगाव शहरातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद प्रकर्षाने पुढे येत असून, दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवरील नाराजी व तणाव वाढल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य उमेदवारी, पॅनेल रचना आणि नेतृत्वाच्या निर्णयावरून पक्षांतर्गत खदखद अधिक तीव्र झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, याउलट विरोधी महाविकास आघाडीत मात्र ‘सूत जुळत असल्याचे’ संकेत मिळत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षांत बैठकींच्या फेऱ्या वाढल्या असून, काही प्रभागांमध्ये एकत्रित पॅनेल व शेअरिंगवर तोंडी सहमती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकसंध लढत झाल्यास सत्ताधारी पक्षांसाठी अडचणी वाढू शकतात, अशी राजकीय कुजबुज सुरू आहे.
राजकीय बदलत्या रेषांमुळे जळगावच्या राजकारणात नवीन रंग भरताना दिसत आहे. नागरिक मात्र विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा ठेवून आगामी घडामोडींवर नजर ठेवून आहेत.







