सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । सन १९९८ पासून आम्ही दूध डेअरीच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात केली.आज हजारो शेतकऱ्यांचा आधारवड असणारा फार्मर मॉल सारखा उद्योग सक्षमपणे उभा केला.परंतु या माझ्या संघर्षमय व यशस्वी वाटचालीमध्ये माझ्या पत्रकार मित्रांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन बेगमपूर येथील फार्मर मॉलचे संस्थापक जनार्दन शिवशरण यांनी केले. ते फार्मर मॉल च्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवशरण म्हणाले की,पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.कारण आरसा जसा खरा असतो,तो खोटे सौंदर्य दाखवत नाही.त्याप्रमाणे पत्रकार समाजातील जखमा,अन्याय,विसंगती तो स्पष्टपणे दाखवतो.कारण सत्याकडे पाठ फिरवून समाज पुढे जाऊ शकत नाही.सत्याचा एक प्रामाणिक शब्द प्रकाश निर्माण करतो आणि तो शब्द लिहीणारा पत्रकार आजही समाजाचा दीपस्तंभ आहे असे त्यांनी सांगितले.पत्रकार हे खऱ्या अर्थाने समाजाचे डोळे आणि कान आहेत.त्यांच्या निर्भीड लेखनामुळेच सामान्यांवरील अन्यायाला वाचा फुटते आणि विकास प्रक्रियेला गती मिळते.तसेच पत्रकार लोकशाही बळकट करुन सत्यासाठी आवाज उठविण्याचे काम करत असतात.समाजाचा आरसा बनून जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम करणारे पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचेही शेवटी उद्योजक जनार्दन शिवशरण यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भीमराव मोरे म्हणाले की, पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. त्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. अशा कार्याची दखल घेऊन उद्योग स्तरावरून दिलेला हा सन्मान निश्चितच सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. या सन्मानाबद्दल व प्रेमळ आदरासाठी त्यांनी फार्मर मॉलचे उपस्थित सर्व पत्रकारांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन हेंबाडे,महेश पाटील,मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण भोसले, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील कसबे, मल्लिकार्जुन देशमुखे,देविदास नाईकनवरे,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे,भीमराव मोरे,मोहन माळी, शिवाजी केंगार,प्रमोद बिनवडे, समाधान फुगारे,विजय भगरे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण गांडुळे, उपाध्यक्ष अक्षय पवार, पत्रकार महादेव धोत्रे, अशोक कांबळे, दिनेश सातपुते, प्रकाश गव्हाणे, शिवाजी जाधव, श्रावण तिर्भे, राजगोपाल खांडेकर, राहुल मस्के, सुशील वाघमारे, दिगंबर गरंडे, प्रसाद कसबे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले, तर फार्मर मॉल उद्योगसमूहाच्या कार्यकारी संचालिका करुणा जनार्धन शिवशरण यांनी सर्वांच्या आभार मानले.







