दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ठाणे पोलीसांनी केले जेरबंद

ठाणे

ठाणे (सहसंपादक नामदेव पाटील) । जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध हत्यारे बाळगणा-या व्यक्तींविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक तयार करून कारवाई करण्याविषयी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले होते.

दि. १० रोजी शहापूर – वाशिंद या भागात विशेष गस्त करीत असतांना वाशिंद अंबाडी रस्त्याने अंबाडीच्या दिशेने दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत टेम्पोसह काही संशयित येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीची शहनिशा करुन संदीप गीते यांनी या पथकाला सूचना दिल्या. पथकाने वाशिंद – अंबाडी रस्त्यालगत मौजे सारमाळ आग्रीपाडा येथे पहाटे ३.३० च्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत ८ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याजवळून एक टेम्पोसह दरोडा टाकण्यासाठी लागणारे धारदार सूरा, लोखंडी सळई, कटवणी, पाना, स्क्रू ड्रायव्हर, पकड, मिर्ची पावडर, नायलॉन दोरी असा एकूण ६ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. जेरबंद केलेल्या संशयितांमध्ये रमेश सीताराम प्रजापती, जावेद शहाआलम खान, आसिफ सलमान खान, आरीफ कासीम शाह, अताउल्ला अजमतुल्ला चौधरी, बद्रूद्दीन इद्रीस चौधरी, महेंद्र हजारीलाल मोर्या, यार महमंद सोहराब चौधरी यांचा समावेश असून, त्यांच्याविरुध्द वाशिंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी देखील त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ.डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, दिपेश किणी, सफौ प्रकाश साईल, पोहवा संतोष सुर्वे, पोशि बोडके व वाशिंद पोलीस स्टेशनचे पोशि सुरेश धिंदळे, शशिकांत दिघे, भिल्ल, नलावडे यांनी यशस्वी केली असून, पुढील तपास वाशिंद पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here