- कोट्ट्यावधींची फसवणूक
- एकच फ्लॅट अनेकांना विकल्याचा आरोप
- राजेंद्र सिंग यांच्या राजेंद्र बिल्डर्स विरोधात मालवणी पोलीसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद
- पोलीसांनी दखल घेतली नसल्याने फिर्यादीने न्यायालयात घेतली होती धाव
मुंबई (संपादक सुनिल पाटील) | मुंबईतील मालाड मालवणी मध्ये ‘डॉल्फीन टॉवर’ या प्रकल्पामध्ये ९ निवासी फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन तब्बल ₹ २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बोरीवली येथील २४ वे महानगर दंडाधिकारी न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला. मालवणी पोलीसांनी मूळ फिर्यादी यांच्या तक्रारीची दाखल न घेतल्यामुळे फिर्यादी आणि पिडीत नरेशभाई रावल यांनी अंधेरी येथील ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या आरगडे अँड आरगडे असोसिएयट्स मार्फत सदर फौजदारी खटला बोरिवली येथे दाखल केला. आरगडे यांचा युक्तीवाद आणि दाखल केलेला खटला विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींवर थेट गुन्हा नोंद करण्याचे आदेश मालवणी पोलीस ठाण्यास दिले.
त्यानुसार मालवणी पोलीस ठाणे येथे ००९०/२०२६ (दिनांक २४ जानेवारी २०२६ ) रोजी राजेंद्र चंद्रमा सिंग यांचे राजेंद्र बिल्डर्स प्रा लिमिटेड विरुद्ध आर्थिक फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील तक्रारदार नरेशभाई शंकर रावल (वय ६६ , रा. ताडदेव, मुंबई) आहेत.
पिडीत फिर्यादीकडून आरोपी राजेंद्र बिल्डर याने २०१० साली मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात असलेल्या ‘डॉल्फीन टॉवर’ नगर भुमापन क्रमांक ३३६ या प्रकल्पामध्ये ९ निवासी फ्लॅट देण्याचे आश्वासन आरोपीकडून फिर्यादी यांस देण्यात आले होते. त्या मोबदल्यात तक्रारदाराने बँक ऑफ बडोदा खात्यातून विविध धनादेशांद्वारे एकूण ₹ २,९४,७८,६००/- इतकी रक्कम अदा केली. रक्कम स्वीकारल्यानंतर दिनांक १८ मार्च २०१० रोजी आरोपीकडून allotment letter देण्यात आले, मात्र त्यानंतर करार नोंदणी, ताबा किंवा मालकी हक्काबाबत कोणतीही ठोस प्रक्रिया करण्यात आली नाही.
तक्रारदाराने सांगितले की, दीर्घ काळ पाठपुरावा करूनही फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने संशय वाढला. पुढे २०१९ मध्ये इमारत पूर्ण झाल्यानंतर चौकशी केली असता, काही फ्लॅट इतर व्यक्तींच्या नावावर विक्री करण्यात आल्याचे, तर उर्वरित काही फ्लॅट कंपनीच्या नावावर ठेवून भाड्याने देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.

एकच फ्लॅट अनेकांच्या नावावर विक्री करण्याचा फौजदारीपात्र फसवणुकीचा गुन्हा
या सर्व प्रकारामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने बोरीवली न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने ९ जानेवारी २०२६ रोजी फौजदारी प्रक्रीया संहिता १५६ (३ ) अंतर्गत आदेश देत पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले, सादर खटल्याचे कामकाज ॲड जीवनदत्त आरगडे यांनी चालविले. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार मालवणी पोलिस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र सध्या नोंद असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४ ) अंतर्गत एकाच आरोपीचा उल्लेख असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, प्रकरणाचे स्वरूप गंभीर असून एकाहून अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, तक्रारदाराने आरोपींची संख्या वाढविण्याची व अधिक कठोर कलमे लावण्याची मागणी केली आहे.
यासाठी तक्रारदाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे यांना आणखी अतिरिक्त लेखी अर्ज सादर केला असून, त्यामध्ये भारतीय दंड संहिता आणि भारतीय न्याय संहिता कलम ४०६, ४०९, ४६७, ४६८, ४७१, १२०- ब तसेच MPID Act अंतर्गत कलम वाढविण्यात यावीत अशी विनंती फिर्यादी मार्फत करण्यात आली आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल येणारे हे याबाबत अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.







