जळगाव तालुक्यात ९५ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ बेळी-निमगाव आमच्या मतदारसंघाचे प्रवेशद्वार – ना. गुलाबराव पाटील

जळगाव

जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) | “बेळी आणि निमगाव ही गावे आमच्या मतदारसंघाचे प्रवेशद्वार आहेत. ज्याप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावरून घराची प्रतिष्ठा कळते, तसेच या गावांच्या विकासावरून मतदारसंघाच्या प्रगतीचे दर्शन घडते. म्हणूनच या गावांच्या विकासावर आमचे विशेष लक्ष राहणार आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी केले.

​जळगाव तालुक्यातील बेळी, निमगाव, जळगाव खुर्द आणि खिर्डी या चार गावांमध्ये एकूण ९५ लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल, शनिवार दि २४ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते पार पडला. जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.
​​या दौऱ्यादरम्यान ना. गुलाबराव पाटील यांनी बेळी येथे स्वयं सहायता बचत गट संचालित दुकानांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आमच्या बहिणींच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि स्वावलंबनासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. लाडक्या बहिणींना केवळ योजनांचा लाभच नाही, तर त्यांच्या हक्काचे व्यासपीठ आणि रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. माझ्या प्रत्येक भगिनीच्या उन्नतीसाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू.”

​कार्यक्रमात खालीलप्रमाणे ९५ लाखांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले:
​१. बेळी (१५ लाख): गावात ५ लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ता कॉँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, १० लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमी पोहोच रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
​२. निमगाव (४० लाख): येथे सर्वाधिक ४० लाखांच्या कामांवर भर देण्यात आला. यात १० लाख रुपये खर्चाच्या ‘अंगणवाडी इमारतीचे’ लोकार्पण करण्यात आले. तसेच २० लाख रुपये खर्चाच्या ‘ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा’ शुभारंभ आणि १० लाख रुपये खर्चाच्या ‘स्मशानभूमी संरक्षण भिंतीच्या’ कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
​३. जळगाव खुर्द (२० लाख): या ठिकाणी १० लाख रुपये निधीतून अंतर्गत रस्ता कॉँक्रीटीकरण आणि १० लाख रुपये निधीतून स्मशानभूमी पोहोच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
​४. खिर्डी (२० लाख): येथे १० लाख रुपये खर्चाचे स्मशानभूमी बांधकाम आणि १० लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमी पोहोच रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
​महायुतीचा ‘विकासाचा महासंकल्प’
​याप्रसंगी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गाव समृद्ध झाले तरच देश प्रगत होईल” या विचाराने मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची गंगा पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ९५ लाखांच्या या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here