ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी एका प्राध्यापकाची भर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.
लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झालं होतं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंग नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाशी धक्का लागला.
या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंग यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.







