सातारा (उपसंपादक अरुण मोरे) । पत्नीच्या खुनप्रकरणी दोषी आढळलेल्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून ₹७६,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सातारा येथील द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला.
दि. १७ जून २०२२ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दादासो गणपत फाळके (वय ३४, रा. कुपर कॉलनी, सदर बझार, सातारा) याने पत्नी माहेरी जात असल्याच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत संगणमताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जे. माने यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदर खटला मा. श्री. एस. आर. तांबोळी, द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती गौरी लकडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एकूण १० साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य व प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे आरोपी क्र. १ दोषी ठरवण्यात आला.
न्यायालयाने आरोपी दादासो फाळके यास भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ₹७६,००० दंड, दंड न भरल्यास ९ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ₹७५,००० रुपये मयत महिलेच्या वडिलांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील आरोपी क्र. २ ते ४ यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले असून आरोपी क्र. ४ याचा खटल्याचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मृत्यू झाला होता. ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव व अमित भरते यांनी प्रभावी कामकाज केले.







