सांगली (प्रतिनिधी) : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ६ लाखांची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आले आहे. हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी ही लाच घेतली असल्याचं धक्कादायक कारण पुढे आलं आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराचा हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी तब्बल ८ लाखांची लाच मागितली होती. तडजोडी अंती सहा लाखांची लाच घेण्याचे ठरले.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या तक्रारीची खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. सापळा रचल्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठरल्यानुसार, सांगलीच्या मिरज मध्ये धाड टाकत ६ लाख रुपये घेताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.







