सांगलीत हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाने ११ जणांना उडवले

हिट ॲण्ड रन

सांगली (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या गणपती पेठ परिसरात रविवारी सायंकाळी ‘हिट अँड रन’चा थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या एका कार चालकाने अवघ्या दहा ते बारा मिनिटांत बेदरकार वाहन चालवत चार पोलिस अंमलदारांसह तब्बल अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते टिळक चौक या मार्गावर धडका देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला अखेर जमावाने पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.

रविवारी सुटी असल्याने गणपती पेठ, कापडपेठ, सराफ पेठ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. त्यातच कृष्णामाई महोत्सवामुळे भाविकांचीही वर्दळ होती. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) हा त्याची कार (एमएच १४ सीबी ४९००) घेऊन पटेल चौकात आला. नशेच्या अवस्थेत असलेल्या पांचाळने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेक वाहनांना व नागरिकांना धडक दिली.
पटेल चौकातून गणपती पेठेतून टिळक चौकाकडे जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला. टिळक चौकात वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक शाखेच्या अंमलदार सुभद्रा निसरट यांनाही त्याने धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीमुळे कार थांबताच संतप्त जमावाने चालकाला गाडीतून बाहेर ओढत चोप दिला. वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. गुन्हा केल्याने लोक भडकले.
या घटनेत पोलिस अंमलदार माया चव्हाण, सपना गराडे, लखन होवाळे, सुभद्रा निसरट यांच्यासह महेंद्र प्रताप पवार (१४), पूर्वी सुनील फराटे (२३), वदन फराटे (३), अनुष्का फराटे (१७), उमा नार्वेकर (५०), स्वप्नील पाटील (३०) असे एकूण अकरा जण जखमी झाले. कार चालक प्रणिकेत पांचाळ हाही जखमी असून सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here