सेंधवा येथील दरोड्याचा शिरपूर पोलिसांनी लावला छडा; ५ आरोपींना बेड्या

शिरपूर पोलिसांनी

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) । मध्यप्रदेशातील सेंधवा येथील एका अगरबत्ती कारखान्यावर सशस्त्र दरोडा टाकून पळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरपूर तालुका आणि शहर पोलिसांनी पाठलाग करून ५ आरोपींना शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन आलिशान कार्ससह एकूण १९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास सेंधवा (मध्यप्रदेश) येथील ‘फ्लॉवर इंडस्ट्रीज’ या सुगंधी अगरबत्ती कारखान्यात ५ ते ७ अज्ञात इसमांनी अनधिकृत प्रवेश केला. दरोडेखोरांनी तेथील सुरक्षारक्षक आणि कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. कारखान्यातून अंदाजे १ लाख रुपये रोख, ३ मोबाईल फोन आणि MP13 ZR 8510 क्रमांकाची राखाडी रंगाची ‘सियाझ’ कार चोरून आरोपी शिरपूरच्या दिशेने पसार झाले.
सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शिरपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर परदेशी आणि शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तातडीने शिरपूर टोलनाका आणि वाघाळी टी-पॉइंट येथे कडक नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी प्रथम चोरलेली ‘सियाझ’ कार अडवून त्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची ‘स्विफ्ट’ कार (MH 12 UC 0302) पोलिसांना पाहून भरधाव वेगाने करवंद नाका गुजराती कॉम्प्लेक्स आमोदा थाळनेर फाटा आणि कुरखळी मार्गे पळ काढू लागली. पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरू केला.
आरोपींनी त्यांची कार सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनाऱ्यावर सोडून झाडीझुडपांतून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कुरखळीचे सरपंच श्री.मुकेश धनगर सावळदेचे सरपंच श्री. अभिजितसिंग राजपूत, मयूर राजपूत आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण परिसराला वेढा घातला. तापी नदीच्या पात्रात आणि काठावर शोधमोहीम राबवून विशाल अनिल दामोदरे (वय २६, रा. वरवाड, ता. दौंड), रमेश बगू करडे (वय ५२, रा. केळगाव, ता. खेड), श्याम तानाजी साळुंखे (वय २९, रा. गोपाळनगर, पुणे), संतोष अण्णा शिवरकर (वय ३०, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) या ४ आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले.
त्यांच्याजवळून मारुती सुझुकी सियाझ कार: १०,००,०००/- रुपये, मारुती सुझुकी स्विफ्ट कार: ५,००,०००/- रुपये, सुगंधी तेल (३७ किलो): ३,७०,०००/- रुपये, रोख रक्कम: ३०,०००/- रुपये, ५ मोबाईल फोन: ४१,०००/- रुपये, अगरबत्ती काड्या: १,०००/- रुपये असा एकूण १९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग, सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली किशोरकुमार परदेशी पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस ठाणे, जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक शिरपूर तालुका पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक हेमंत खैरनार, शिरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ रविंद्र अखडमल, पोहेकॉ राजेंद्र रोकडे, पोकॉ योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोड अखडमल, भटु साळुंखे, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ अल्ताफबेग अस्मानबेग मिर्झा, पोहेकॉ संजय आसाराम चव्हाण, पोकॉ वाला पुरोहित, मनोज नेरकर, होमगार्ड दिपक बच्छाव, होम गौतम सत्तेसा यांनी संयुक्तरीत्या यशस्वी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here