पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आणि भीमशक्ती-शिवशक्ती-लहुशक्ती समन्वय प्रमुख गुलाबराव गरूड यांच्या हस्ते डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा विशेष सन्मान व गौरव करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे यांच्या कार्याचा गौरव करताना शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले म्हणाले,”डॉ. नीलमताई गोऱ्हे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झुंजार व लढाऊ महिला नेतृत्व आहेत. सलग पाच वेळा विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून येणे, हा त्यांच्या अविरत कार्याचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. महिलांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी विधानपरिषदेत नेहमीच आक्रमक व सकारात्मक भूमिका घेतली आहे.”
युवराज दाखले यांनी पुढे बोलताना सांगितले की, डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण, बचत गट चळवळ, हुंडाबळी विरोधी कायदा आणि व्यापारी महिलांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी व कामगार महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघाची महिला आघाडी यापुढे अधिक जोमाने काम करेल.
“नीलमताई या केवळ शिवसेनेच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. विरोधकांनाही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करता येत नाही, हीच त्यांची खरी राजकीय ताकद आणि लोकप्रियतेची पावती आहे,” अशा शब्दांत दाखले यांनी भावना व्यक्त करत शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे येथे संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिवशक्ती-भीमशक्ती-लहुशक्ती समन्वयक प्रमुख नेते गुलाबराव गरूड, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सचिन जाधव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







